नाती. रक्ताची आणि बिनरक्ताची. खरंतर, वैद्यानिकदृष्ट्या अगदी वैश्विक पातळीवर बघयला गेलं, तर बिनरक्ताची नाती सुद्धा रक्ताचीच होतात. पण व्यावहारिकदृष्ट्या ढोबळ मानानी आपण नात्यांची अशी वर्गवारी करू शकतो. हे जरी खरं असलं तरी, एखाद्या व्यक्तीशी आपलं नातं असणं आणि आपलं नातं आहे हे आपण अंगीकारणं यात खूप फरक आहे. म्हणजे, माझ्या बाबतीत तरी आहे. ही तफावत अनेक कारणांमुळे असू शकते. मी ब्राम्हण आणि इतर असा जातपात करणारा नाही, पण थोडसं निरीक्षण केलंत तर असा दिसून येतं की अनेकदा देशस्थ ब्राम्हण नाती जपतात, वाढवतात, आपलीशी करतात आणि कोकणस्थ ब्राम्हण सगळा कारभार दोन हात लांबूनच करतात. जास्त 'गळेपडूपणा' नको, थोडक्यात आवारा, हे त्यांचं पालुपद! अर्थात, हे माझ्या छोट्याश्या वैयक्तिक जगातलं निरीक्षण आहे आणि ते सगळ्या ब्राम्हणांना लागू पडतं असा माझं म्हणणं किंवा अट्टाहास अजिबात नाही! अशी अनेक उदाहरणं बघितली की असं लक्षात येतं की तुमच्या घरातलं वातावरण, संस्कार, तुमचं व्यक्तिमत्व आणि त्यात वयोपरत्वे होणारे बदल असे अनेक घटक त्यास कारणीभूत असू शकतात. या साऱ्यांमध्ये मला व्यक्तिमत्व हा एक खूप महत्वाचा दुवा वाटतो. घरातलं वातावरण आणि संस्कार यांचा पगडा एका विशिष्ट वयापर्यंतच राहतो. त्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्व विकासाची दिशा हीच, तुम्ही नाती आपलीशी करता की एक हात दूर ठेवता, हे ठरवते असं माझं निरीक्षण आहे. मग कुणाच्या स्वावलंबी व्यक्तिमत्वाला देशस्थ, कोकणस्थ अशी बंधनं राहत नाहीत तर एखाद्या परावलंबी व्यक्तिमत्वासाठी ती एक चौकट असते. यात वाईट किंवा चूक असं काहीच नाही. जिथं प्रकाश तिथं अंधाराला थारा नाही त्यातला हा प्रकार. पण पर्याय असेल तर मला स्वावलंबी होऊन ती चौकट आखून घ्यायला किंवा झुगारून द्यायला जास्त आवडेल आणि पटेल. खरंतर आवडलंय, पटलंय आणि अंगीकारलंय असं म्हणायला हरकत नाही!
आता कुणी कडवे कोकणस्थ मला म्हणतील की 'तुला तू "कोकणस्थ" असल्याचा अभिमानाच नाही असं वाटतं!'. आणि अगदी स्पष्टच बोलायचं झालं, तर मी म्हणेन की मला नाहीये असला काही व्यर्थ अभिमान. आजच्या जगात अशा बिदाग्या मिरवणं हे आपण किती मागासलेले आहोत हे जगाला ओरडून सांगण्यासारखं आहे असं प्रामाणिकपणे वाटतं! अशी विशेषणं मिरवण्यात ज्यांना धन्यता होती ते बुडत्या पेशवाईसकट काळाच्या ओघात नष्ट झाले. आज जे आहेत ते फक्त पेंढा भरलेले पुतळे, फट म्हणता जाळून खाक होणारे! मी त्यातला नाही यातच माझी धन्यता! मला स्वतःला 'महाराष्ट्रीय', 'मराठी', 'भारतीय' म्हणून घेण्यात जास्त समाधान वाटतं! प्रत्येक नवी पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा काहीपट हुशार असते, या न्यायानी असा विचार करा की उद्या तुमच्या मुलांनी तुम्हाला विचारलं की "ब्राम्हण म्हणजे काय?" तर तुमचं काय उत्तर असेल? उत्तराचा विचार करण्याआधी असाही विचार करा की तुम्ही ते उत्तर २०२० किंवा २०५० मध्ये तुमच्या मुलांना देताय. मला वाटत नाही की तो पर्यंत आजच्या कोणत्याही जातीविषयक संकल्पना शाबूत असतील, अर्थात टोपिकारांची 'काडेघाली' वगळता! त्यामुळे उत्तर कठीण आणि पर्यायानी त्यावर येणारे प्रतिप्रश्न तर त्याहून कठीण. माझ्या किंवा त्याधीच्या पिढीतल्या मुलांची काय बिशाद होती की एकतर असले विचित्र प्रश्न विचारतील आणि त्यातही बाबांच्या उत्तरावर प्रतिप्रश्न करतील! १९८० आणि १९९० च्या दशकातल्या आम्हां मुलांना - "टेलिफोन कसा काम करतो?" "आपल्याकडे कलर टीवी कधी येणार?" "इंटरनेट म्हणजे काय?" हे प्रश्न जास्त जवळचे होते. आज तसं नाही. आज मुलं तंत्रद्यानाची उत्तरं गर्भातून आणि सामाजिक प्रश्न मुखांतून घेऊन येतील असं वाटतं!
अर्थात, म्हणून, जे जे 'ब्राम्हण' ते ते मला नावडतं असं अजिबात नाही. मला मान्य नाही ती वर्गवारी. 'शुभंकरोती', 'पर्वाचा', श्लोक, आर्या, आरत्या, स्तोत्रं, भजनं इत्यादी अतिशय वाचनीय, गेय, श्राव्य, आणि संस्करणीय यात शंका नाही! एखाद्या गोष्टीची 'सवय', 'सराव', आणि 'नियम' म्हणजे काय याची लहान मुलांना पहिली ओळख 'शुभंकरोती' आणि 'पर्वाचा' तून होते. संस्कृतामुळे उच्चारण स्वच्छ होतं. अशा अनेक चांगल्या उपयोगी गोष्टी आहेत. त्या जरूर घ्याव्यात. कोणीही घ्याव्यात. पण आम्ही 'कोकणस्थ', आम्ही 'देशस्थ', आम्ही 'सारस्वत' - याचं आजच्या जगातलं स्थान आणि उपयुक्तता प्रत्येक ढोल बडविणार्याने जोखून घ्यावी एवढंच!
असो, तर, मी कसा "खरा" ब्राम्हण नाही यावर पुष्कळ दिवे पाजळल्यानंतर नात्यांकडे परत येऊया! नात्यांबाबातीत मला नेहमीच "शक्यतो जास्त गळ्यात पडायचं नाही" असाच उपदेश मिळत आला आहे. पण मी आहे तिरपाकड्या डोक्याचा. ज्या दिशेला बोट दाखवलं त्याच्या विरुद्ध दिशेला का नाही दाखवलं, म्हणून तिथे आधी जाऊन बघणाऱ्यातला . त्यामुळे त्या उपदेशातला फक्त "शक्यतो" तेवढा मी लक्षात ठेवला, आणि चालत राहिलो. आज मागे वळून बघतो तर मित्र "नातेवाईक" झाले आहेत आणि नातेवाईकांचे मित्र. "आज मागे वळून बघतो तर .." असं लिहिलंय म्हणून लगेच 'वय काय आणि काय बोलतोय' असं म्हणू नका. या वाक्याचे अधिकार फक्त षष्ट्यब्दीपूर्ती नंतरच मिळतात असं अजिबात नाही आणि तसं असेलंच तर थोडं ३० एक वर्ष आगाऊ लिहितोय असं समजा!
जिवलग मित्रांच्या गाठी कुठे आणि कशा जुळाव्यात याचेही काही संकेत असावेत. ज्या शाळेत १० वर्ष शिकलो, त्या शाळेतले आज मोजणीत हाताच्या बोटावर मावतील एवढेच जवळचे मित्र आहेत. ज्यांची आठवण 'उठता-बसता, खाता-पिता' होते अशा यारांची गावं निराळी .. शाळा, कॉलेज निराळी! तरी सूर जुळले आणि गाठी पक्क्या झाल्या. त्यांच्या खासगी जगांत त्यांनी माझ्या चंचूप्रवेशासाठी जागा केली यातच मला कोण आनंद! आज त्यातले काही प्रथितयश संशोधक तर काही उद्योगपती, कुणी यशस्वी manager, कुणी engineer, कुणी बँकेत तर कुणी अजून काही ... सगळे यशस्वी आणि प्रगतीशील! पण आजदेखील शेकडो मैलांवरून त्यातल्या कुणाशीही बोलताना मी नकळत जाऊन बसतो तो आमच्या जुन्या, ठरलेल्या नाक्यावर, अगदी क्षणार्धात! मग तेव्हा स्थल-कालाची कुठलीही बंधनं आड येत नाहीत, सामाजिक वजनाचा कचरा होतो, भाषा सोवळ्यातून मुक्त होते आणि धरणाचे सगळे दरवाजे फोडून पाणी धो धो वाहतं!
नात्यांचं आणि मैत्रीचं कोड जर असं १००-२०० ओळींत उलगडणारं असतं तर अजून काय हवं होतं? पण तरीही ज्या गोष्टींच्या पाऊलखुणा माणसांच्या मनात उमटलेल्या असतात त्यांचा थांग घेण्याचं वेड मला आहे. वैद्यानिक आणि मानसशास्त्र या दोन्ही अंगांनी ते तितकच रंजक आहे. असो. माझ्या छोट्या जगाची ही एक छोटीशी गोष्ट. तुमचीपण अशी एखादी गोष्ट असेलंच की, काय म्हणते ती?
No comments:
Post a Comment
आपला ऋणानुबंध असाच कायम राहावा हीच ईच्छा!