मला खरंतर, 'लिहिण्याविषयी थोडसं' असं लिहायचं होतं वरती .. पण, माझ्या लिखाणाचं गौडबंगाल लक्षात घेता, या पानाचं शीर्षक 'प्रस्तावना' असं आहे तेच ठीक आहे! .. नाहीतर 'थोड्या लिखाणाविषयी बरचसं' अशी अवस्था झाली असती!
'प्रस्तावना' हा वरपांगी जरी फारच पोक्त शब्द वाटत असला तरी अनेक पुस्तकांमधून झालेल्या पिळवणुकीनंतर आजकाल त्याचा भारदस्तपणा बराच कमी झाला आहे. प्रस्तावनेमध्ये, 'मी हे का लिहितोय?' या अनुषंगाने का वाट्टेल ते लिहून खपवता येतं, त्यामुळे मला मुक्तसंचार करायला इथे पुष्कळ वाव आहे! आणि तसंही, प्रस्तावना कोण वाचतंय म्हणा? तसं बघायला गेलात तर या प्रस्तावाने पलीकडे आणि अलीकडे मी जे काही लिहीन ते तरी 'मज पामाराखेरीज' दुसरं कोण वाचणार आहे? असो! तरी कुरुक्षेत्रावर कृष्णानी अर्जुनाला दिलेल्या सल्ल्यानुसार मी लिहिण्याचं काम करणार आहे, कुणी भरकटत आलाच वाचायला तर आनंद आहे! एरवी, 'देणं नास्ति आणि घेणं नास्ति'!
गेली ५-६ वर्ष मी वेगवेगळ्या माध्यमांतून मी लिहित आलेलो आहे. पण त्यातलं बरचसं इंग्रजीत आहे. मराठीत खूप सातत्यानी लिहिलं ते मात्र पुष्कळ वर्षांपूर्वी शाळेत असताना. शाळेच्या 'पारिजात' या वार्षिक अंकाच्या प्रत्येक आवृत्तीत आम्ही नेहमीच काहीनाकाही लुडबुड आवर्जून केलेली आम्हाला आठवते! इथं हे सगळं आठवून आमचा स्वतःविषयीचा आदर अचानक वाढल्यामुळे आम्ही आदरार्थी बहुवाचनात शिरलो त्याबद्दल क्षमस्व! शाळेत आणि शाळेनंतर सुद्धा मराठीशी कवितांमधून संबंध राहिला तो आजतागायत! कधी ईच्छा झाली तर एखाद-दुसरा नमुना दिसेलच इथे. एकतर मराठी माध्यमाचा विद्यार्थी असल्यामुळे त्या भाषेशी जुळलेली नाळ ही इंग्रजी पुस्तकांची कितीही पारायणं केली आणि इंग्रजीमध्ये कितीही झेंडे गाडले तरी सहसासाहजी न तुटणारी आहे! असो, तर शाळेनंतरच्या वर्षांत, विशेषतः कॉलेज सुरु झाल्यानंतर सुसंगत विचारांची सांगड ही इंग्रजीमधूनच जास्त झाली आणि त्याचा मला आनंदच आहे! त्यामुळे मराठी मुलांची जी भाषा सहसा इतकी पक्की नसते त्या भाषेवर मला छान पकड घेता आली. कवितेमधेही इंग्रजीची भर पडली. इंग्रजीत ब्लॉग्स लिहून झाले. संभाषणंही झाली. इतकी सगळी मुशाफिरी होऊन सुद्धा, आज जेव्हां तहान लागते तेव्हां माझी गाडी थेट मराठीच्या तांबड्या मातीत येऊनच तृप्त होते. याचं कौतुकही वाटतं, अभिमानही वाटतो, समाधान आणि तितकंच अप्रूपही वाटतं! आणि नंतर एक गोष्ट प्रकर्षानी जाणवते की ज्या माणसाच्या कानावर पु.लं., आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, मर्ढेकर, बापट, आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, विंदा, पाडगावकर, शांता शेळके ... यांसारख्या अनेक महत्तम दिग्गजांचे शब्द कानावर पडले आहेत त्या माणसाला मराठीचं विस्मरण होण्यासाठी आधी मरण यावं लागेल!
असो, तर गेल्या काही महिन्यांत, काही चांगलं मराठी वाचण्याचा योग आला आणि त्यातच सुचेताचा मराठी ब्लॉग सापडला. तिचं लिखाण वाचल्यानंतर आपणही थोड्याफार सातत्यानी काहीबाही लिहिलं पाहिजे या इच्छेनी मनात चांगलाच जोर घेतला. काल-परवा तर इतका अतिरेक की झोपण्याऐवजी मला लिहिण्यासाठी वेगवेगळे विषय, मुद्दे, शीर्षकं सुचत राहून झोपेचं पार खोबरं झालं! आता लिखाणाचा छोटासा 'श्रीगणेशा' करण्यावाचून गत्यंतर नाही असा साक्षात्कार झाला आणि काही नाही तर कमीतकमी एक नवा ब्लॉग तयार करून 'प्रस्तावना' तरी लिहून ठेवू, पुढचं पुढे, असा म्हणत आज त्याला मुहूर्त मिळाला! आता यात खरं कौतुक सुचेताचं की तिचं लिखाण हे वाचणाऱ्यालाही लिहिण्यासाठी प्रवृत्त करण्या एवढं प्रभावी आहे! त्यामुळे ही प्रस्तावना म्हणजेच 'नमनाला घडाभर तेल' हे खरंतर तिच्यासाठी! तिचा 'अमलताश' तर छान फुललाच आहे आणि लवकरंच भविष्यात एखादा कथासंग्रहही तिच्या हातून तयार होईल यात यत्किंचितही शंका नाही!
ठिणगी तर पेटली आहे. आता त्याचा वणवा होऊन साऱ्या रानाला तो सामावून घेतो की जेमतेम शेकोटी होऊन राहतो हे बघायचे! पण स्वरूप काहीही असले तरी त्या आगीची धग मात्र तितकीच विखारी असेल, कारण उस्फुर्ततेला कधीच कुठलं कृत्रिम आवरण चढवता येत नाही. असो! सरतेशेवटी मलाच नाही तर प्रत्येकाला हरबऱ्याच्या झाडावरून दाणकन उतरवायला तुम्ही सगळी वाचक मंडळी आहातच की! तस्मात, लोभ असावा हि विनंती!
ठिणगी तर पेटली आहे. आता त्याचा वणवा होऊन साऱ्या रानाला तो सामावून घेतो की जेमतेम शेकोटी होऊन राहतो हे बघायचे! पण स्वरूप काहीही असले तरी त्या आगीची धग मात्र तितकीच विखारी असेल, कारण उस्फुर्ततेला कधीच कुठलं कृत्रिम आवरण चढवता येत नाही. असो! सरतेशेवटी मलाच नाही तर प्रत्येकाला हरबऱ्याच्या झाडावरून दाणकन उतरवायला तुम्ही सगळी वाचक मंडळी आहातच की! तस्मात, लोभ असावा हि विनंती!
No comments:
Post a Comment
आपला ऋणानुबंध असाच कायम राहावा हीच ईच्छा!